मुंबई- साकिनाका विभागातील मोहिली व्हिलेज पाईप लाईन परिसरात असलेल्या साईनाथ नगरमध्ये पालिका विभागातर्फे मंगळवारी 8 घरांवर तोडक कारवाई करण्यात आली होती. ही तोडक कारवाई येथे झोपु योजना राबवत असलेल्या विकासकाच्या दबावामुळे केल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार आणि आमदार नसीम खान यांनी या तोडक कामाची बुधवारी पाहणी केली.
विजय वड्डेटीवार यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. हा विभाग सखल असून या विभागात जवळजवळ सर्वच घरे ही 14 फुटापेक्षा उंच असताना विकासकाला विरोध केलेल्या घरांवरच पालिकेने तोडक कारवाई का केली? कमीत कमी पावसाळ्यात तरी ही कारवाई अमानवी आहे. सत्ताधारी आणि विकासकाला फायदा करण्यासाठी पालिकेने हात मिळवणी करून ही घरे पाडण्याची कारवाई केली. या विरोधात आयुक्तांच्या कार्यालयात घुसून आंदोलन करू असा इशारा या वेळी वड्डेटीवार यांनी दिला. आमदार नसीम खान यांनी देखील पालिकेवर टीका केली.