मुंबई : 2014 मध्ये मनसेकडून राज्यातील टोलनाक्यांवरील टोल वसुलीविरोधात आंदोलन छेडले होते. याच दरम्यान 26 जानेवारी 2014 रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरेंनी टोलच्या विषयावरून जोरदार टीका केली.
टोलनाक्यांवर नागरिकांची लुट
टोल नाक्यांवर नागरिकांची लुट केली जात असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. टोल बंद करण्याची मागणीही राज ठाकरेंनी या भाषणात केली. यावेळी वाशी टोलनाक्यावरही नागरिकांची लुट केली जात असून हा टोलनाका बंद केला पाहिजे असे राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. या सभेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावर हल्ला केला. तसेच या टोलनाक्यावर तोडफोडही केली.
राज ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा
यानंतर वाशी पोलीस ठाण्यात 30 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरेंसह मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे आणि इतर 7 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. राज ठाकरेंच्या भाषणानंतरच मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्ला केला म्हणून राज ठाकरेंवरही प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी 2018 ते 2020 दरम्यान राज ठाकरेंना नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. अनेक वेळा समन्स पाठविल्यानंतरही राज ठाकरे हजर न झाल्याने बेलापूर कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले होते.