मुंबई - महाराष्ट्रातील पहिलीपासूनचे सर्व वर्ग 1 डिसेंबरपासून नियम-अटींसह सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, तत्पूर्वीच राज्यात व विशेषत: शहरी भागात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंचा प्रादुर्भाव वाढला व मुंबई-पुण्यासह शहरी भागातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत पुन्हा बंद ठेवण्यात आल्या. आता 15 डिसेंबरला मुंबईतील शाळा सुरू होणार का, याबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी (EXCLUSIVE interview of school education minister Varsha Gaikwad) महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
प्रश्न - कोरोनाचा अतिशय कठीण काळ होता शाळांसाठी आणि मुलांसाठीही. अजूनही ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. मुंबईमध्ये १५ डिसेंबरनंतर शाळा सुरू होणार आहेत, असं आपण म्हणतोय मात्र नेमकी परिस्थिती काय आहे ?
वर्षा गायकवाड - कोरोनाचा काळ प्रत्येकासाठी व आमच्यासाठीही आव्हानात्मक काळ होता. (Varsha Gaikwad on School Reopen) कारण मुलांना शिक्षण कसे द्यायचे हा प्रश्न उभा होता. कोरोनामुळे संपूर्ण लॉकडाऊन लागू होता त्यामुळे मुलांना शाळेमध्ये बोलवू शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये मुलांना शिक्षण देत असताना आपण ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी व नेटवर्कचा प्रॉब्लेम समोर आला. अशा ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने शिक्षणाच्या सूचना देण्यात आल्या. गुगलचा व व्हॉट्सअॅपचा कसा वापर केला पाहिजे, याचा आढावा घेण्यात आला. मला सांगायला आवडेल की, शिक्षकांनी आणि पालकांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि शिक्षकांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले. शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या आहेत. शहरामध्ये शाळा सुरू करण्याबाबत महानगरपालिकांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करत आहोत.
प्रश्न - दहावी, बारावीच्या परीक्षा आणि प्रवेश यासंदर्भात निर्णय घेणे किती आव्हानात्मक होते?
वर्षा गायकवाड - दहावीनंतरच्या प्रवेशासंदर्भात दहावीचा रिझल्ट सर्वात मोठा प्रश्न होता तो कसा केला पाहिजे . मात्र त्यावरही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू शकलो. मुलांच्या परीक्षा रद्द करून त्यांचे अतर्गत मूल्य़मापन करण्यात आले. शिक्षक असतील. मुख्याध्यापक अशा सर्वांनीच खूप सहकार्य केले. ऑनलाइन पद्धतीने त्याचबरोबर ऑफलाईन परीक्षा झालेल्या मुलांसाठी पेपर तपासण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये, कुठे शाळेमध्ये शिक्षकांनी तपासण्याचे काम केलं.
प्रश्न - डिजिटल अटेंडन्स हा काय नवीन प्रयोग करता आहात, याबद्दल काय सांगता येईल?
वर्षा गायकवाड - शिक्षण विभागाने आता महा ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची डिजिटल हजेरी लावली जाणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांची अचूक उपस्थिती आपल्याला कळणार आहे. याचा फायदा मुलांच्या शाळा गळतीची नेमकी संख्या करण्यासाठी होणार आहे. विशेष म्हणजे मुलींची संख्या कमी होते का आणि जर होत असेल तर त्याचा पाठपुरावा करता येणे यामुळे शक्य होणार आहे.
प्रश्न - काही शाळांमध्ये पट वाढवण्यासाठी बोगस विद्यार्थी दाखवले जातात, त्यासाठी हे ॲप किती उपयोगी ठरेल?
वर्षा गायकवाड - वास्तविक हे ॲप शाळाबाह्य मुलांच्या नोंदणीसाठी शाळांमध्ये नेमकी किती मुलं उपस्थित आहेत आणि पटसंख्या किती कमी झाली आहे किती गळती आहे. यासाठी तयार केले आहे. मात्र जर कुठे गैरप्रकार होत असतील. बोगस विद्यार्थी नोंदणी करून परत संख्या वाढवण्याचे प्रकार होत असतील तर ते प्रकार सुद्धा या माध्यमातून नक्कीच समोर येतील.
प्रश्न -ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा कशा घेणार?
वर्षा गायकवाड - दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप महत्त्वाचं असतं. जीवनामध्ये दहावी आणि बारावीचा टप्पा हा खूप महत्त्वाचा असतो. सर्वांसाठी एकच परीक्षा एकाच वेळी घेण्याचे आपले उद्दिष्ट आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सध्या तरी ऑफलाईन परीक्षा घेण्याचा आमचा विचार आहे. मात्र जर काही परिस्थिती बदलली तर त्या पद्धतीने नक्कीच भविष्यात विचार केला जाईल. तसेच बोर्ड बदलण्याचा सध्या कुठलाच विचार प्रस्तावित नाही.
प्रश्न - तुमच्यावर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे त्याच पद्धतीने उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची जबाबदारी ही पक्षाने दिली आहे. नुकताच तुम्ही उत्तर प्रदेशचा दौरा केलात काय चित्र दिसले?
वर्षा गायकवाड - माझ्यावर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्षाने (Varsha Gaikwad on UP Assembly Election)सोपवली आहे त्यानिमित्ताने मी नुकतीच उत्तर प्रदेशात जाऊन आले. आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या सक्रिय प्रचारामुळे उत्तर प्रदेशातील वातावरण ढवळून निघाले आहे. लोकांमधे उत्साह संचारला आहे. मुख्य म्हणजे महिलांना आम्ही राजकारणात 40 टक्के संधी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. मी गावा गावात जात होते लोकांना भेटत होते, त्यावेळेस लोकांकडून खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. आम्ही मुलींना शिक्षणासाठी मोफत सायकल आणि मोबाइल देणार आहोत याची घोषणा केली आहे. आता भाजपला काँग्रेस हाच पर्याय दिसतो आहे.
प्रश्न - उत्तर प्रदेशात नेहमीच अल्पसंख्यांक आणि दलितांची मते काँग्रेसला मिळाली मात्र सवर्णांची मतं मिळत नाहीत अशी चर्चा होते?
वर्षा गायकवाड - उत्तर प्रदेशात असं जातीनिहाय राजकारणाचे चित्र आहे हे मान्य आहे. (Varsha Gaikwad on UP Assembly Election) मात्र आम्ही कोणत्याही जातींचा पुरस्कार न करता सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. काँग्रेस पक्ष हा लोकशाही मुल्ये मानणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना न्याय दिला जातो. आम्ही जातीपातीचे राजकारण करत नाही. मात्र सोशल इंजिनिअरिंग करण्याची गरज आहे आणि आम्ही ती नक्की करू. सवर्ण मानला जाणारा समाज काँग्रेसवर विश्वास ठेवून नक्कीच सोबत येईल यात शंका वाटत नाही.
प्रश्न-शिवसेना यूपीएमध्ये सामील झाल्यास हिंदूंची मते मिळतील असे वाटते का?
वर्षा गायकवाड - यूपीमध्ये कोण सामील व्हावं हा पक्षश्रेष्ठी आणि सोनिया गांधी यांचा अधिकार आहे मात्र शिवसेना युपीएमध्ये सहभागी होत असेल तर त्यांचं स्वागतच आहे..