मुंबई - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह बंगल्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई उपनगरातील भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर येथील आंबेडकरी संघटनांनी निषेध नोंदवत पोलीस ठाण्यात निवेदन देत आंदोलन केले आहे. उपगरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए), वंचित बहुजन आघाडी , भीम आर्मी सहीत विविध संघटनांनी यात सहभाग घेतला.
हल्ला झालाच कसा असा प्रश्न उपस्थित करीत आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या राजगृहावर हल्ला हे कटकारस्थान असून दलितांवर होणारे अत्याचार रोखण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे आम्ही शांततेत आंदोलन करीत आहोत. राजगृहावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने ताब्यात न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी विविध संघटना प्रतिनिधींनी दिला.
यावेळी शांततामय वातावरणात हे आंदोलन सुरू असून आमच्या संयमाची परिक्षा सरकारने घेवू नये अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा रिपाइंचे जॉली मोरे यांनी दिला आहे. तर आमचा पोलिसांवर विश्वास असून ते आरोपींना लवकरच अटक करतील, तरी सुध्दा आरोपी अटक होण्यास विलंब लावू नका अन्यथा आमच्या दणक्याने आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे भारत हराळे यांनी दिला आहे.