मुंबई- देशात निर्मित असलेलया दोन लसींची चाचणी 'डेल्टा प्लस' व्हेरियंटवर सध्या सुरू आहे. या दोन्ही लसी या व्हेरियंटवर प्रभावी असणार आहेत का? याची चाचपणी संशोधकांकडून प्रयोगशाळेत सुरू आहे. या चाचणीचा निकाल येत्या 7 ते 10 दिवसांमध्ये समोर येणार असल्याचं 'आयसीएमआर'क़डून सांगण्यात आलं आहे.
- डेल्टा प्लसचा धोका -
कोरोनाचा विषाणू बदलत आहे. कोरोनाच्या बदललेल्या विषाणूला डेल्टा असं नाव देण्यात आलं. बदललेल्या डेल्टानं स्वत:मध्ये पुन्हा बदल केला. सध्या बदललेल्या व्हेरियंटला डेल्टा प्लस असं नाव देण्यात आलं आहे. दुसऱ्या लाटेत डेल्टानं थैमान घातलं होतं. त्यातच आता डेल्टा प्लस समोर आल्यामुळं भितीचं वातावरण झालं आहे. दुसरी लाट ओसरतेय तोपर्यंत तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. तिसऱी लाट आली तर या लाटेत डेल्टा प्लस अग्रेसिव्ह असेल का? या प्रश्नाचं उत्तर अद्याप अनुत्तरित आहे. मात्र, संभाव्य धोक्याविरोधात लढईची तयारी सध्या सुरू आहे.
- देशातील डेल्टा प्लस व्हेरियंटची स्थिती -
'आयसीएमआर'कडून मिळालेल्या माहितीनुसार, जगातील 12 देशात या व्हेरियंटचे रुग्ण सापडले आहेत. भारतात 48 डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व 48 रुग्ण भारतातील 12 राज्यात सापडले आहेत. तसंच प्रयोगशाळेत डेल्टा प्लस या व्हेरियंटवर लस प्रभावी होत आहे का? याची चाचणी केली जात आहे. 7 ते 10 दिवसात याचे परिणाम दिसतील. सकारात्मक परिणाम आल्यास भारत हा जगातील एकमेव देश असेल की ज्यानं या नव्या व्हेरियंटवर चाचणी करुन जगासमोर रिझल्ट दिला आहे, अशी माहिती आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. भार्गव बलराम यांनी दिली.
- डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणजे काय?
कोरोना विषाणूच्या स्वरूपात बदलांमुळे, डेल्टा प्लस प्रकार तयार झाला आहे. हा विषाणू प्रथम युरोपमध्ये आढळला होता. स्पाइक प्रोटीन हा कोरोना विषाणूचा मुख्य भाग आहे. ज्याच्या मदतीने हा विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवतो.