मुंबई - कोविड - १९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेंतर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आज (१७ सप्टेंबर) रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येवून कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या कारणाने उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा - यंत्रमाग घटकांना ऑनलाइन अर्जास 2 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
वॉक इन पद्धतीने लस
कोविड - १९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र आज (शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१) रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत राबवले जाणार आहे. मुंबईतील सर्व २२७ निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणाने, उद्या साठीची प्रचलित ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.
१ कोटी ७ लाख लसीचे डोस
मुंबईत गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी पालिकेने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू केली. आतापर्यंत एकूण १ कोटी ७ लाख ४२ हजार ८८७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये ७५ लाख ३७ हजार १४१ लाभार्थ्यांना पहिला, तर ३२ लाख ५ हजार ७४६ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्र एटीएसचे पथक दिल्लीत दाखल, तर जान मोहम्मद शेखच्या कुटुंबासह रेल्वे तिकीट काढून देणाऱ्याची सुटका!