मुंबई : पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर राज्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरु होणार ( Children Covid Vaccination Maharashtra ) आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aaditya Thackeray ) यांच्या हस्ते मुंबईतील बांद्रा कुर्ला कोविड सेंटरमध्ये ( Bandra Kurla Covid Centre ) लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
लसीकरणाच्या नोंदणीला सुरुवात
जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांची, पालकांची चिंता कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं 3 जानेवारीपासून कोरोनाची ( Corona Vaccine for Children ) लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी ( Corona Vaccine Registration for Children ) सुरु झाली आहे. Co-WIN वर थेट नोंदणी करता येत आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलं 1 जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर नोंदणीसाठी पात्र आहेत. नोंदणीसाठी 10 वीचे ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
मुंबईत ९ लसीकरण केंद्रांवर मुलांचे लसीकरण
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ या आजाराकरीता प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण कार्यक्रमात सुरुवातीला प्राधान्य गटाचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिका व सरकारी रुग्णालयात ३०२, खासगी रुग्णालयात १४९ अशी एकूण ४५१ कोविड १९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्र व राज्य सरकारच्यावतीने मुंबई महानगरपालिकेला आतापर्यंत १ कोटी २० लाख ६५ हजार ८३० एवढ्या लशींचे डोस प्राप्त झाले आहेत. ९९ लाख २४ हजार ७२१ लाभार्थ्यांना (१०७ टक्के ) पहिला डोस व ७९ लाख १७ हजार ७०३ एवढया लाभार्थ्यांना (८६ टक्के) दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानंतर १५ ते १८ वयोगटातीला लहान मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला पालिकेने ९ लसीकरण केंद्र निश्चित केली आहेत.