मुंबई - मुंबईमध्ये गेले पाच महिने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. आजपासून (सोमवारी) केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु केले आहे. मात्र लसीचा होणारा पुरवठा आणि लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये, यासाठीच राज्य सरकारने यात टप्पे पाडले आहेत. त्यानुसार आजपासून मुंबईमध्ये ३० ते ४४ वयोगटातीला नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लवकरच आढावा घेऊन १८ ते २९ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु केले जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
३० ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू -
मुंबईमध्ये आजपासून ३० ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात आले. याबाबत माहिती देताना काकाणी बोलत होते. यावेळी बोलतांना गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लस पुरवठा चांगला होत आहे. एप्रिल महिन्यात ८ लाख ७० हजार, मे महिन्यात ४ लाख ५७ हजार लसींचा पुरवठा झाला होता. जून महिन्यात आतापर्यंत जवळपास ६ लाखांपेक्षा अधिक लसपुरवठा झाला आहे. मुंबईत एका केंद्रावर रोज १०० लसी दिल्या जात होत्या. लसीचा पुरवठा वाढल्याने प्रत्येक केंद्रावर ३०० लसी दिल्या जात आहेत. ७५ टक्के लस साठ्यावर केंद्र सरकारच नियंत्रण आहे. राज्य सरकाराच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला लस साठा मिळतो. लस साठा वाढल्यास अधिक केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती काकाणी यांनी दिली आहे.
'लवकरच १८ ते २९ वयोगटातील लसीकरण'
मुंबईत गर्दीचे नियोजन करता यावे याकरीता १८ ते ४४ वयोगटात ५० लाख लोकसंख्या आहे. यामुळे दोन गट करण्यात आले आहेत. यापैकी राज्याच्या निर्णयानुसार ३० ते ४४ च्या वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. या वयोगटाच्या लसीकरणाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर आठवडाभरात १८ ते २९ वयोगटातील लसीकरण सुरु केले जाईल, असे काकाणी यांनी सांगितले.
हेही वाचा -#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..