मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना असा वाद चांगलाच पेटला आहे. दुसरीकडे कंगनाच्या ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. यावरून आता कंगनाच्या समर्थनार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कंगनाविषयी चुकीच्या भाषेचा वापर केल्यानंतर आता तिला त्रास देण्यासाठी तिच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला जात आहे. ही एकूणच गुंडागर्दी असून, शिवसेनेने अशी गुंडागर्दी करू नये अशा शब्दात आठवले यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
कंगनाने मुंबईत येऊनच दाखवावे असा इशारा शिवसेनेने दिला होता. आठवले यांनी या वादात उडी असून, कंगनाला संरक्षण देण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार आज आरपीआयचे कार्यकर्ते सकाळपासून मुंबई विमानतळावर तळ ठोकून होते. तर कंगना मुंबईत आल्यानंतर ती जिथे जात आहे तिथे कार्यकर्तेही पोहचत आहेत.
दरम्यान, आज पालिकेकडून करण्यात आलेल्या कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईवर रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेला आताच जाग कशी आली? मुंबईत मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे आहेत, त्यांच्यावर का कारवाई होत नाही? शिवसेनेसह सर्वच पक्षांची अनधिकृत बांधकामे ऑफिस मुंबईत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. तर ही कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
कंगना मुंबईबद्दल जे काही बोलली ते चुकीचेच आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की एका कलाकाराला, महिलेला अशी वागणूक सत्ताधाऱ्यांनी द्यावी. हे संविधानविरोधी आहे. तर आम्ही संविधान पाळणारे आहोत. त्यामुळेच आम्ही तिला संरक्षण देत आहोत, असे रामदास आठवले म्हणाले.
पालिका अधिकाऱ्यांना कोर्टात खेचावे
कंगना आपल्या ऑफिसवरील कारवाईविरोधात कोर्टात गेली आहे. पण तिने मुळात आता ज्या अधिकाऱ्याने ही कारवाई केली, ज्याने हे आदेश दिले त्याला तिने कोर्टात खेचावे, असेही आठवले यांनी म्हटले आहे. तर हा सल्ला लवकरच आपण कंगनाला भेटून देणार आहोत. तसेच तिला सर्व मदत करणार आहोत, असे ही त्यानी स्पष्ट केले आहे.