मुंबई - शिवेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात गुरुवारी शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.
शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करणारे पत्र सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बुधवारी प्रत्यक्ष फोन करून त्यांना सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत जावून काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. यावेळी त्यांनी गांधींना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रित करणार असल्याचे शिवसेनेचे संजय राऊत यांनी मंगळवारी म्हटले होते.
हेही वाचा-उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नव्हते इच्छुक.. 'या' कारणामुळे अखेर झाले तयार !
महाविकासआघाडीत शिवसेना सहभागी-
गेली तीस वर्षे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी असलेल्या शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदावरून भाजपशी मतभेद झाले. त्याची परिणिती म्हणून शिवसेना ही महाआघाडीबरोबर आल्याने नवीन महाविकासआघाडी राज्यात अस्तित्वात आली आहे. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना यामध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे त्यामुळे या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कोणते बडे नेते हजेरी लावणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.