मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदावर विराजमान होत आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे संपादकपद सोडले. सामनाच्या संपादकपदी आता संजय राऊत यांची वर्णी लागली आहे. सध्या ते सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.
हेही वाचा - 'हाऊ इज जोश'...संजय राऊतांचे ट्विट
शासकीय पदावर असताना वर्तमानपत्राच्या संपादकपदी राहता येत नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी संपादकपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या कार्यकारी संपादकपदी असलेले संजय राऊत यांची मुख्य संपादकपदी निवड झाली आहे.
दरम्यान, सामनामधून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली जाते. निवडणुकांच्या काळात संजय राऊत यांनी सामनातून लिहिलेले अग्रलेख, रोज होणाऱ्या पत्रकार परिषदा, सोशल मीडियावरून त्यांनी कायमच शिवसेनेची बाजू परखडपणे लावून धरली. त्यामुळेच सामनाच्या संपादक पदी त्यांची निवड झाली आहे.