मुंबई - एकत्र निवडणूक लढताना दोन्ही पक्षांना सहमत असलेल्या फॉर्म्युलावर द्विपक्षीय नेते बैठक घेऊन चर्चा करतील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच राज्यातील जनतेने सर्व राजकीय पक्षांचे डोळे उघडले असून, युतीला मिळालेल्या विजयाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत.
निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते पत्नी रश्मी ठाकरेंसोबत होते. ठाकरे घराण्यातील कोणीही थेट निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ होती. यासाठी शिवसेनेकडून वरळी मतदारसंघाची निवड करण्यात आली होती. या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना 89248 मतदान झाले आहे.
त्यावर प्रतिक्रिया देताना, आई वडील म्हणून आदित्यचा अभिमान वाटत असून, त्याला जनतेने दिलेल्या प्रेमासाठी मी नतमस्तक होत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच शरद पवार यांना राज्यभरातून मिळत असेलल्या प्रतिसादाबद्दल विचारल्यानंतर दुसऱ्याचे चांगले झाल्यास मला आनंदच आहे, असे ते म्हणाले. यामध्ये माझ्या पोटात दुखण्याचे कोणतेही कारण नसल्याच्या भावना ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
आमचं ठरलयं असं म्हणताना,'आता मी ठरवणार' या भूमिकेत उद्धव ठाकरे असल्याचे चित्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते व नीलम गोऱ्हे हे सेनेचे नेते उपस्थित होते.