मुंबई - शिवसेनेच्या 50 आमदारानंतर आता 12 खासदारांनी देखील बंडखोरी केली ( Rebel Shiv Sena MP ) आहे. सध्या हे सर्व बारा खासदार संसदीय अधिवेशन सुरू असल्याने दिल्लीत आहेत. दिल्लीत जाऊन या सर्व खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला आपले समर्थन दिल आहे. हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का सध्या मानला जातोय. मात्र, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) देखील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आता अधिक आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ( Uddhav Thackeray On BJP )
'बाण घेऊन जा, धनुष्य माझ्याकडे' - उत्तर भारतीय महासंघाच्या नेत्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "माझ्या तरंगातून तुम्ही कितीही बाण काढले, तरी तो बाण मारण्यासाठी तुमच्याकडे लागणारे धनुष्य माझ्याकडे आहे. आमचे लोक देशद्रोही नाहीत. भाजप आमच्या जनतेची दिशाभूल करून देशद्रोहाचे काम करत आहे. माझी जनता आम्हाला सोडून गेली याचे मला दु:ख नाही, पण अडचण अशी आहे की भाजपला शिवसेनेला संपवायचे आहे. भाजप कोंबडा लढवत आहे. जर या लढाईत एक कोंबडा मेला, तर दुसऱ्या कोंबड्यालाही मारून शिवसेनेला मारतील, अशा प्रकारे त्यांचा हेतू पूर्ण होईल."
हेही वाचा - शिवसेनेला धक्का ! 12 खासदारांचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे; खासदारांनी दिला एकनाथ शिंदेंच्या गटाला पाठिंबा
खासदारांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट - महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता पक्षाला वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांच्या अडचणी वाढत आहेत. आज शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेच्या 12 बंडखोर खासदारांनी मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात पक्षाचा नेता बदलण्याची विनंती केली.
आधी आमदार आता खासदार - लोकसभेतील पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी सभापतींना पत्र दिल्यानंतर आज शिवसेनेच्या १२ खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली. विनायक राऊत यांनी पत्रकात म्हटले होते की, प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे यांनी गटबाजीचे कोणतेही प्रतिनिधित्व विचारात घेऊ नये. आधीच शिवसेनेचे 55 आमदार दोन गटात विभागले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला 40 आमदारांचा पाठिंबा आहे, तर 15 आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार पडले. त्याचवेळी शिवसेनेचे 12 खासदार बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले आहेत.
दिल्लीत शेवाळेंचा गौप्यस्फोट - भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणी झाली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. त्यावेळी ठाकरे यांनी पुन्हा भाजपासोबत जाण्याचे सूतोवाच केले होते. मात्र चर्चा फिस्कटल्याने पक्षप्रमुखांनी तुमच्या स्तरावरती युती करण्याचे आदेश दिले होते. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसारच आम्ही भाजपासोबत युती केल्याचा, गौप्यस्फोट खासदार राहुल शेवाळे ( Shiv Sena rebel leader Rahul Shewale ) यांनी केला आहे. दिल्लीत आज ( मंगळवारी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. खासदार शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
हेही वाचा - Rahul Shewale : उद्धव ठाकरे भाजपासोबत युतीसाठी तयार होते पण...; खासदार शेवाळेंचा गौप्यस्फोट