मुंबई - सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकारला अधिकाऱ्यांमुळे फटका बसला आहे. सत्तेत आल्यानंतर काही अधिकारी सरकारची माहिती फडणवीस यांना पुरवत असल्याचा आरोप झाला. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी थेट गृहमंत्र्यांवर आरोप केले. तर राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी खोटी कारवाई केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अनेक अडचणी या सरकारच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी बाजूला सारून काम करत असताना महाविकासआघाडी समोर काही अधिकाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण केलेल्या पाहायला मिळतात. एकूणच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नैसर्गिक आपत्ती, कोरोनाचे संकट यासोबतच काही अधिकाऱ्यांच्या कामांचा फटका देखील महाविकास आघाडी सरकारला बसलेला आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामावर देखील राज्य सरकारने बोट ठेवले आहे.
हे ही वाचा -मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांना राजस्थानमधून धमकीचा फोन
अधिकारी फडणवीसांना भेटल्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात -
भारतीय जनता पक्षाच्या नेते, तसेच राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तसेच नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. मात्र हे आरोप करत असताना काही अधिकारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. ही भेट झाल्यानंतर आघाडी सरकारमधील मंत्री तसेच नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात असा खळबळजनक आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. एकूणचं अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून काही अधिकारी जाणून-बुजून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षासाठी काम करत असल्याचा हा आरोप करण्यात आला होता.
अधिकार्यांवर मंत्रिमंडळाचा अविश्वास
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर काही अधिकारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काही अधिकारी माहिती पुरवत असल्याचा आरोप काही मंत्र्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अधिकाऱ्यांबाबत नाराजी बोलून दाखवली होती. अनेक वेळा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बैठकीच्या सभागृहातून अधिकाऱ्यांना बाहेर जाण्याचे निर्देश दिले जात होते. त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या चर्चा असतील त्या चर्चा केवळ मंत्री करत होते. त्यामुळे याबाबत काही अधिकार्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सरकारचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक नाही का, असाही आरोप महाविकास आघाडी सरकारवर करण्यात आला होता.
हे ही वाचा - ईडी-सीबीआयच्या कारवाईवर रोहित पवारांचा गौप्यस्फोट; वाचा, नेमके काय म्हणाले...
समन्वयाच्या अभावामुळे आघाडी सरकारला फटका -
महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. या अभावामुळेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला राज्य सरकारला आळा घालता आलेला नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या आधी देवेंद्र फडणीस यांचे सरकार पाच वर्षे सत्तेत होते. या पाच वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारने प्रत्येक खात्यामध्ये आपल्या सोयीनुसार अधिकाऱ्यांची बदली करून घेतली होती. त्याचा कोठे ना कोठे आताही भारतीय जनता पक्षाला फायदा होतो आहे. त्यामुळेच अनेक वेळा आघाडी सरकारच्या कामांमध्ये अधिकाऱ्यांच्या आडमुठे कारभाराचा फटका पाहायला मिळतो, असं मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केलं आहे.