मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी श्रीराम जन्मभूमीसंदर्भात ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात याचे स्वागत होत आहे. सध्या राज्यात भाजपशी काडीमोड झाला असला, तरिही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीत हे मोठे पाऊल असल्याचे सांगत पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
राम मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली. 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' या नावाचे हे ट्रस्ट असणार आहे. राम मंदिराच्या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 9 फेब्रुवारीपर्यंत ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला 67.7 एकर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित ट्रस्ट स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन होत असून नियोजित कार्यक्रमानुसार मी अयोध्येलाही जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.