मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपनगरात कायमस्वरूपी 5000 बेडचे संसर्गजन्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. त्यानुसार यासाठी 20 एकर जागा संपादित करण्यासाठी पालिकेने काढलेल्या निविदेला अखेर प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी दोन निविदा सादर झाल्या असून मंगळवारी निविदा खुल्या केल्या जातील. त्यामुळे मंगळवारीच निश्चित होईल की, मुंबईतील पहिले मोठे संसर्गजन्य रुग्णालय कुठे उभारले जाईल.
मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था महामारीचा सामना करण्यासाठी अपुरी असल्याचे कोरोना काळात सिद्ध झाले. मुंबईत एकमेव कस्तुरबा रुग्णालय संसर्गजन्य रुग्णालय असून ते खूपच छोटे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5000 बेडचे कायमस्वरूपी संसर्गजन्य रुग्णालय उभारण्यासाठी जागा शोधण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने यासाठी किमान 20 एकर जागेची गरज असल्याचे म्हणत यासाठी निविदा मागविल्या. ज्यांच्याकडे पश्चिम वा पूर्व द्रुतगती मार्गालगत 20 एकर जागा आहे अशा बिल्डर, जमीन मालकांना निविदेद्वारे पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण यासाठी केवळ एकच निविदा आल्याने पालिकेने निविदेला मुदतवाढ दिली होती.
या दुसऱ्या मुदतवाढीत मात्र दोन निविदा सादर झाल्या आहेत. मुंबईसारख्या शहरात 20 एकर मोकळी जागा असणे मोठी बाब आहे. त्यामुळे दोन निविदा सादर होणे हा खूप चांगला प्रतिसाद असल्याचे म्हटले जात आहे.
दोन जणांनी यासाठी निविदा सादर केली आहे. तर आता कुणीही मुदतवाढ मागितलेली नाही. तेव्हा मंगळवारी या निविदा खुल्या केल्या जातील आणि त्याचवेळी कोणी निविदा सादर केल्या आहेत हे समजेल. तर पुढे निविदेची छाननी करत नक्की कुठे 5000 बेडचे रुग्णालय बांधले जाईल, हे स्पष्ट होईल, अशी माहिती भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (जमीन) पालिका यांनी दिली आहे.