मुंबई - पश्चिम उपनगरातील उच्चभ्रूंसह झोपडपट्टीतील नशेबाजांना अफगाणी चरस विकणाऱ्या दोन ड्रग्ज तस्करांना अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने रंगेहाथ पकडले. अंधेरीच्या डोंगर परिसरात चरस घेऊन ते दोघे आले असता त्यांच्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्याकडून एक कोटी एक लाख 25 हजार किमतीचा चरस साठा जप्त केला.
अंधेरी पश्चिमेकडील डोंगर परिसरात एक ड्रग्ज तस्कर चरस विकायला येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटला मिळाली होती. त्यानुसार वांद्रे युनिटच्या पथकाने डोंगर परिसरात सापळा रचून मोहम्मद जाफर अब्दुल कलाम सिद्दीकी (वय, 26) आणि समीर शब्बीर शेख (वय, 25) हे दोघे तेथे येताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. दोघांकडे तब्बल 2 किलो पाच ग्रॅम वजनाचा अफगाणी चरस साठा सापडला. सिद्दीकी हा अंधेरीच्या डोंगर परिसरात चरस विकणारा मुख्य तस्कर आहे. तसेच दोघे आरोपी हे पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू नशेबाजांना चरस विकत असल्याचे तपासात समोर आले आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष बांद्रा युनिट यांनी अंधेरी परिसरातून जाफहर अब्दुल कलाम सिद्दीकी (वय,26), समीर शेख (वय, 25) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 2 किलो 25 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. यांची आंतरराष्ट्रीय बाजार किंमत 1 करोड 1 लाख 25 हजार रुपये इतकी आहे. हे दोन्ही आरोपी पश्चिम उपनगरात अंधेरी ते बांद्रा परिसरात उच्चभ्रू सोसायटी तसेच झोपडपट्टी परिसरामध्ये विक्री करत असल्याची माहिती आहे. तसेच या दोन्ही आरोपींचा संबंध आंतरराष्ट्रीय टोळीशी देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.