मुंबई - कॉर्डीलीया क्रूझवर एनसीबीने (अमली पदार्थ विरोधी पथक) कारवाई केली होती. मात्र, एनसीबीने केलेली ही कारवाई केवळ दिखावा असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच ही कारवाई झाल्यानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दहा जणांना ताब्यात घेतले असे सांगितले. मात्र, त्यानंतर केवळ आठ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन लोकांना या कारवाईतून सोडले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. ज्यांना एनसीबीने सोडले त्यापैकी एक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या जवळचा नातेवाईक असल्यामुळे त्याला सोडण्यात आले, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. तसेच यासंबंधी आपण सर्व पुरावे उद्या पत्रकार परिषदेतून समोर आणू, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
'भाजप विरुद्ध राष्ट्रवादी करण्यासाठी आम्ही तयार' -
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीयांच्या नातेवाईकांवर कालपासून आयकर विभागाकडून धाडी टाकल्या जात आहेत. केवळ राजकीय सूडापोटी आणि राजकीय हेतू ठेवून भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करत अशा प्रकारच्या कारवाया करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. अजित पवार आणि महा विकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार नाही, अशा राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून तेथील सरकारला बदनाम करण्याचा अजेंडा भाजपचा आहे. मात्र, येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बुडवलेल्या बँकेच्या चौकशा सुरू होतील, असा इशाराही मलिक यांनी दिला आहे. तसेच राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे चित्र निर्माण होणार असेल तर त्यासाठीदेखील आम्ही तयार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - नियमाने जे काही असेल ते जनतेसमोर येईल... घाबरायचे काहीही कारण नाही - अजित पवार