मुंबई - जगभरात कोरोनानंतर आता ओमायक्रॉन विष्णूचा प्रसार होऊ लागला आहे. राज्यात डोंबिवलीत १ (Kalyan - Dombivali) , पिंपरी चिंचवडमध्ये ६ (Pimpari Chinchwad) तर पुणे (Pune) येथे १ ओमायक्रॉनचा रुग्ण असे एकूण ८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज मुंबईमधील २ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० (10 Omicron patients in Maharashtra) झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव -
पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार जोहांसबर्ग (दक्षिण आफ्रिका) हून दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे सिध्द झाले आहे. या रुग्णासोबत राहिलेल्या आणि २५ नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या त्याच्या ३६ वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे . या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत . हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत. या दोन्ही रुग्णानी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या ५ अतिजोखमीच्या आणि ३१५ कमी जोखमीच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
१० प्रवासी ओमायक्रॉन पॉजिटीव्ह -
राज्यात अति जोखमीच्या देशातून ६२६३ तर इतर देशातून २८ हजार ४३७ असे एकूण ३४ हजार ७०० प्रवासी राज्यात आले. त्यापैकी अति जोखमीच्या देशातील ६२६३ तर इतर देशातील ६३५ अशा एकूण ६ हजर ८९८ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून अति जोखमीच्या देशातून आलेले ११ प्रवासी आढळून आले आहेत. त्यापैकी १० प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
नागरिकांनी भीती बाळगू नये -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे..
हेही वाचा - Omicron Variant : राज्याची चिंता वाढली.. पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण