मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता इतर सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत बदल केला आहे. या रचनेवरुन सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसकडून दोन सदस्यीय प्रभाग रचना असावी, अशी भूमिका कार्यकारणीच्या बैठकीत घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेना असा वाद रंगणार आहे.
कॉंग्रेसचा विरोध
सन 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच विद्यमान सरकारने कायद्यात बदल केला. दरम्यान, पुन्हा एक सदस्यीय वार्ड पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. पवार यांनी प्रभाग पद्धतीचा निर्णय रद्द केला होता. आता मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना केली. या प्रभाग रचनेला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. आज (गुरुवार) काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सर्व महापालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग रचना असावी, असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
महाविकास आघाडीत दुमत!
बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चार सदस्यीय प्रभाग रचनेचा मुद्दा मांडला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना द्विसस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यबिंदू काढत तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मात्र, कॉंग्रेसने संबंधित निर्णयाविरोधात आज मत मांडल्याने महाविकास आघाडीत दुमत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - ...म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट