मुंबई -मुंबईहून तीन मुली आणि दोन मुले उत्तराखंड फिरण्यासाठी गेले होते. ते तपोवनमधील गंगा व्ह्यू हॉटेलमध्ये थांबले होते. ऋषिकेश येथे देवदर्शन झाल्यानंतर ते आंघोळीला गेले होते. यावेळी मधुश्री खुरसंगे, अपूर्वा केळकर आणि मेलरॉय दांतेस हे तिघे जण वाहून गेले. आतापर्यंत तिघांबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यावर त्यांनी घरी एकच आक्रोश केला.
तीन जण गेले वाहून -
मुंबईच्या बोरिवली पूर्वेतील रहिवासी मधुश्री खुरसंगे आपल्या 4 मित्रांसह उत्तराखंड फिरण्यासाठी गेली होती. ते तपोवनमधील गंगा व्ह्यू हॉटेलमध्ये थांबले होते. ऋषिकेश येथे देवदर्शन झाल्यानंतर ते गंगा नदीत आंघोळीला गेले होते. यावेळी अपूर्वाचा पाय घसरून ती गंगेच्या प्रवाहात गेल्याने वाहू लागली. तिला वाचवण्यासाठी तिचे दोन मित्र नदीच्या प्रवाहात उतरले. मात्र, नदीचा प्रवाह हा जोरदार असल्याने काही क्षणात तिघेही वाहून गेले आहेत. मधुश्री खुरसंगे, अपूर्वा केळकर आणि मेलरॉय दांतेस असे वाहून गेलेल्या तिघांची नावे आहे. निशा गोस्वामी आणि करण मिश्रा सुखरूप वाचले आहेत.
औषध निर्मितीसंदर्भातील घेत होते शिक्षण -
या घटनेचा माहिती खुरसंगे कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांच्या घरात एकच आक्रोश झाला. यावेळी घरच्यांनी सांगितले की, मुले डॉक्टरांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणार होती. या 5 जणांपैकी 3 जण औषध निर्मितीसंदर्भातील शिक्षण घेत होते. विदेशात जाण्यापूर्वी देवदर्शनासाठी ते गेले होते.
शोध मोहीम सुरू -
तर बदनगावजवळ टिहरी तलावात गावकऱ्यांना एका महिलेचा मृतदेह आढळला असल्याची माहिती आहे. मात्र, या मृतदेहाची ओळख पटली नसून मृतदेह शवागारात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, शोध मोहीम जवानांकडून ऋषिकेश पासून ते हरिव्दारपर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली आहे, अशी माहिती एसडीआरएफचे अधिकारी कविद्र सिंह यांनी दिली आहे.