मुंबई - शहरात दहशत पसरवण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दुकलीला मुंबई पोलिसांच्या युनिट 11 ने अटक केली आहे. 2 एप्रिलला मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरावर रात्रीच्या वेळेस दोन अज्ञात गुन्हेगारांनी गोळीबार केला होता. या संदर्भात शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक 11 कडे गुन्हा वर्ग झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी अभिलेखावर असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मार्वे रस्त्यावर सापळा रचण्यात आला. यावेळी अनिकेत अरुण परिहार (वय-20), क्लाइव्ह बेनसेन्स बोराटो (वय-19) हे दोन आरोपी संशयास्पदरित्या वावरताना आढळले. पोलिसांनी सबंधितांची चौकशी करून अंगझडती घेतल्यावर या आरोपींकडून पाच बोअरचे 1 रिवॉल्वर व 1 जिवंत काडतुस आढळून आले.
काही दिवसांपूर्वी या आरोपींनी हे शस्त्र उत्तर प्रदेशातून आणले होते. आरोपी राहत असलेल्या परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी 4 एप्रिलला रात्री 11 वाजता एका जेष्ठ नागरिकाच्या घरावर गोळी झाडली. यात कोणीही जखमी किंवा मृत झाले नव्हते. मात्र यानंतर पोलिसांनी तपास करून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी सराईत सोनसाखळी चोर असल्याचे पोलीस तापासात समोर आले आहे.