मुंबई राज्यात आलेल्या परदेशी गुंतवणुकीवरून राजकीय रण सुरू आहे. वेदांता फॉक्स कॉन हा प्रकल्प अद्याप गेला नसल्याचा दावा सरकार करत असताना हा प्रकल्प परत आणून दाखवा असे आव्हान विरोधकांनी दिले आहे. मात्र या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात छोटे- छोटे प्रकल्प उभारून अधिक रोजगार निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले आहे. या दृष्टीने कोकणात एक महत्त्वाचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून 25 ते 30 हजार लोकांना रोजगार मिळेल असा दावाही सामंत यांनी केला आहे.
मरीन पार्क आणि मँगो पार्क महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा सागर किनारा लाभला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनाऱ्यावर अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य आणि मासेमारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा हा पट्टा आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मासेमारी चे उत्पन्न घेतले जाते. हजारो टन मासळी या ठिकाणाहून निर्यातही केली जाते. मासेमारीच्या या उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच अतिशय मोठ्या प्रमाणात वैविध्यपूर्ण मासळी या ठिकाणी मिळत असून ही चविष्ट मासळी आणि या मासळीच्या बायो वेस्टपासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येऊ शकतात. या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणेने सूसज्ज असे मरीन पार्क उभे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या ठिकाणी माशांवर प्रक्रिया केली जाणार आहे. एका विशिष्ट तापमानाखाली हे मासे साठवले जाणार असल्याने हे मासे सुमारे वर्षभर टिकू शकतात. तसेच ते मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात करण्यासाठी या ठिकाणी जेटी उभारण्याचा विचार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
आंबा आणि काजू पार्क रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामध्ये केवळ मरीन पार्क उभे करण्यात येणार नसून आंबा पार्क आणि काजू पार्क ही तयार करण्यात येणार आहे. कोकणातील सुप्रसिद्ध असा हापूस आंबा आणि दर्जेदार काजूचे उत्पादन होत असल्याने या फळांवर प्रक्रिया उद्योग या ठिकाणी उभारला जाणार आहे, अशी माहिती ही सामंत यांनी दिली आहे.
रत्नागिरीत 500 एकर जमिनीवर प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात लोटे परशुराम एमआयडीसीच्या अंतर्गत सुमारे दीडशे ते दोनशे एकर जमिनीवर प्रकल्प करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, ही जमीन कमी पडणार आहे. तसेच निर्यातीच्या दृष्टीने गैरसोयीची ठरणार असल्याने रत्नागिरीतील जयगड नजीक सुमारे पाचशे एकर जमिनीवर मरीन पार्क, अंबा पार्क आणि काजू पार्क निर्माण करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला सव्वा दोनशे कोटी रुपये निधीची आवश्यकता असणार असून त्याबाबतची तरतूद करण्यात येणार आहे. या उद्योगाच्या माध्यमातून राज्यात 25 ते 30 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. अशाच प्रकारे राज्यात प्रत्येक जिल्ह्यात छोटे प्रकल्प उभारून अधिक रोजगार निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे, असेही उदय सामंत यांनी सांगितले आहे.