मुंबई - मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा मोठा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज याबाबत अधिकृतरित्या शासन निर्णयसुद्धा काढण्यात आला आहे.
शासनाने दिली मान्यता
मार्च २०२०पासून कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२०पासून राज्यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. दरवर्षी साधारणतः जूनमध्ये सर्व राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होत असते. मात्र, कोरोनामुळे २०२१-२२मध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरू करता आलेल्या नाहीत. वेळेवर शाळा सुरू करता न आल्यामुळे वेळेत पाठ्यक्रम पूर्ण करण्याबाबत समस्या निर्माण होऊ शकते. त्याअनुषंगाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा इयत्ता पहिली ते बारावीच्या पाठ्यक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव सद्यस्थितीतही कमी झालेला दिसून येत नाही. या अनुषंगाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता सुद्धा सन २०२०-२१प्रमाणे २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा
ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादेमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन व शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25 टक्के अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे.