मुंबई - अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 2021-22 यावर्षांचा देशाचा अर्थसंकल्प आज सादर केला. मात्र हा अर्थसंकल्प निराशा करणारा असल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील 'खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा', अशी टीका केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर केली आहे.
आर्थिक थापा बंद करायला हव्यात-
'बजेटमध्ये महाराष्ट्र शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. बजेटचा डोलारा महराष्ट्रावर अवलंबून असूनपण निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे. 'खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा', तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत.' आकडे येत असतात, ते किती खरे हे ६ महिन्यांनी समजते.
आर्थिक थापा बंद करायला हव्यात. नाशिक व नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला, हे पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
काही राज्यांच्या निवडणुका लक्षात घेवून निधी वाटप-
संजय राऊत म्हणाले, 'मुंबईची मेट्रो का अडकून ठेवलीय? जमीन केंद्राची आहे म्हणतात. कुठून मंगळावरून जमीन आणली का? शेतकऱ्यांचे जरा ऐका. भांडवलदारांसाठी कायदे बनवले आहेत. काही राज्यांच्या निवडणुका लक्षात घेवून निधी वाटप केले आहे का?
देशाचे बजेट की पक्षाचे बजेट-
देशाचे बजेट की पक्षाचे बजेट होते. पेट्रोलचे भाव 100 रुपये लिटर पर्यंत पोहोचले आहेत. आता, 1 हजार रुपये लीटर करून कायमचं मारायचं आहे का? तसेच, 1 हजार रुपये लिटर पेट्रोल झाल्यानंतर लोकं घरातून बाहेर पडणारच नाहीत. पेट्रोल दरामुळे लॉकडाऊन होईल, असे म्हणत केंद्र सरकारवर राऊत यांनी टीका केली आहे.
हेही वाचा- अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचा अपेक्षाभंग - अजित पवार