नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून शुक्रवारी राज्यसभेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जो खरं बोलतो किंवा लिहितो त्याला देशद्रोही ठरवलं जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
शेतकऱ्यांच्या एकजुटीत सरकारला देशद्रोह दिसत आहे
शेतकरी आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाच्या प्रतिष्ठेसाठी ही चांगली गोष्ट नसल्याची टीकाही राऊत यांनी राज्यसभेत केली. शेतकऱ्यांच्या एकजुटीत सरकारला देशद्रोह दिसत आहे. शेतकऱ्यांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न सरकार का करत आहे असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सीमेवर खिळे ठोकणे हे योग्य नाही
शेतकरी संपूर्ण देशाची लढाई लढत आहेत. पंजाबचा शेतकरी मुघलांशी लढला तर आपण त्याला योद्धा म्हणत होतो, ब्रिटिशांसोबत लढला तर त्याला देशभक्त म्हणत होतो. मात्र आज हा शेतकरी स्वतःच्या अधिकारासाठी लढत आहे, तर त्याला खलिस्तानी ठरविले जात आहे, हा कुठला न्याय आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर खिळे ठोकले जात आहे, हे योग्य नाही असे म्हणत संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला आहे. हेही वाचा - मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी