मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात ( st employees strike ) फूट पडल्याचे चित्र असताना शनिवारी (दि. 13) परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab ) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली. दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.
सुवर्णमध्य काढणार
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. सुमारे पंधरा दिवस रस्त्यावर धावली नाही. संपामुळे बसगाड्या बंद असल्याचा मोठा फटका राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना वाहने उपलब्ध नाहीत. रेल्वेच्याही मर्यादीत गाड्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शिवाय परीक्षांपासूनही त्यांना वंचित राहण्याची वेळ आली. हा संप मोडीत काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर भेट घेतली. त्यांच्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत 10 मिनिटे महत्त्वाची चर्चा झाल्याचे समजते. तसेच संपावर समन्वयाने सुवर्णमध्य कसा काढता येईल, यावर चर्चा झाल्याचे समजते.
एसटीचा प्रवास सुरू
दुसरीकडे भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात काही एसटी कर्मचारी ठाण मांडले आहे. राजकीय पक्षाच्या चिथावणीखोर विधानांना बळी न पडता कामावर रुजू व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले होते. त्यानंतर आता एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. शुक्रवारी 17 आगारांमधून 36 बसगाड्या सोडण्यात आल्या व त्यातून 826 प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. एसटी रस्त्यावर आल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे बोलले जाते.
हे ही वाचा - ST WORKERS STRIKE : राज ठाकरेंनी घेतली पवारांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा