मुंबई - राज्यात वाढत्या कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. मुंबईचा समावेश या तिसऱ्या टप्प्यात करण्यात आलेला आहे. तिसऱ्या स्तरात असलेल्या मुंबईत दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. सलून, चित्रपटाची शूटिंग, बेस्ट बसेस मध्ये सर्वसामान्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. यानंतर मुंबईच्या रस्त्यांवरही वाहतूक वाढलेली दिसत आहे. वाहन संख्याही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. काही अंशत: टाळेबंदी उठवल्यानंतर हेच चित्र पूर्व द्रुतगती मार्गावर दिसून आले.
रस्ते वाहतुकीवर वाढला ताण
आजपासून मुंबई टाळेबंदी उठण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक दिसून येत आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झालेली दिसत आहे. सार्वजनिक वाहतुकीला अजूनही पूर्णपणे परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची गर्दी दिसत आहे. आजपासून बसेस पूर्णक्षमतेने धावणार आहेत, मात्र उभे राहून प्रवास करता येणार नाही. रेल्वे मात्र सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण वाढलेला आहे.
कोरोनाचे नियम पाळत राहा
लोक घरातून बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. 'मात्र जास्त गर्दी करू नका विनाकारण घरातून बाहेर निघू नका', असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. "कोरोनामुळे लोक ‘नॉकडाऊन’ झाले, असेही व्हायला नको. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळत राहा. आपण मर्यादित धोका पत्करून निर्बंध शिथिल करत आहोत. त्यासाठी काही निकष ठरवून वर्गवारी केली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे याबाबत निर्णय घेईल", असे सांगत अर्थचक्र पुन्हा सुरू करण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचा संदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल दिला होता.
तिसरा टप्पा म्हणजे काय
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10% आहे. कोरोना रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिजनची बेडसंख्या 40% टक्क्यांपेक्षा कमी आहे. अशा जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आलेला आहे.
हेही वाचा - बेस्टच्या बसेस आजपासून पूर्ण आसनक्षमतेनुसार सुरू