मुंबई - कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या पोलीस खात्यात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत 135 ने भर पडली आहे. तर राज्यात 2095 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. यात तब्बल 236 पोलीस अधिकारी असून 1859 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील 22 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 897 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 75 पोलीस अधिकारी व 822 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही 1178 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 160 पोलीस अधिकारी व 1018 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबई पोलीस खात्यातील 200 हुन अधिक पोलीस कर्मचारी हे कोरोनातून बरे होऊन पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत.
लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 16 हजार 670 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 706 जणांवर क्वारंटाईन मोडल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 254 घटना घडल्या असून यात आतापर्यंत पोलिसांनी 833 जणांना अटक केली आहे. कोविड 19 च्या संदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 96 हजार 697 कॉल आले असून अवैद्य वाहतुकीच्या 1323 प्रकरणात 72 हजार 755 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या संदर्भात आतापर्यंत 23 हजार 307 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडीकल स्टाफवर 40 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 86 पोलीस कर्मचारी हे जखमी झाल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.