मुंबई - नीट यूजी या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यामध्ये ओडिशाच्या शोयब आफताब याने ७२० पैकी ७२० गुण मिळवून देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. त्याने पैकीच्या पैकी गुण मिळवून नीटच्या परीक्षेत विक्रम निर्माण केला आहे. नीटच्या परीक्षेत महाराष्ट्रातून आशिष झान्टे हा प्रथम व मुलीतून सरोज पटेल प्रथम आली आहे. अपंग विद्यार्थ्यांमध्ये प्रणव रुद्रवार याने बाजी मारत देशातून चौथा येण्याचा मान पटकावला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून देशभरात १३ ते १४ सप्टेंबरदरम्यान नीट यूजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेला देशभरातून १५ लाख ९७ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा देता आली नाही त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १४ ऑक्टोबर रोजी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालानंतर देशभरातून ७ लाख ७१ हजार ५०० विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यात मुलींची संख्या चार लाख २७ हजार ९४३ इतकी आहे. या परीक्षेला राज्यातून सर्वाधिक १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थी बसले होते. या पैकी ७९ हजार ९७४ विद्यार्थी निकालानंतर प्रवेशास पात्र ठरले आहेत.
पहिल्या पन्नासमध्ये राज्यातील चार जण
देशात पहिल्या पन्नासमध्ये राज्यातील चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात आशीष सोबतच तेजोमय वैद्य, पार्थ कदम, अभय चिलर्गे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्याच्या निकालात मोठी घसरण
नीटच्या परीक्षेत देशातील सिक्कीम, नागालँडनंतर सर्वात कमी निकाल महाराष्ट्र राज्याचा लागला आहे. महाराष्टात नीट परीक्षेचा केवळ ४०.९४ टक्के इतका निकाल लागला आहे. सर्वाधिक निकालांमध्ये चंदीगड, हरियाणा, दमन आणि दीव व दिल्ली आदी राज्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या नीट यूजीच्या परीक्षेला हजारो विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती. ग्रामीण भागातील अनेक जिल्हास्तरावर परीक्षा केंद्र देण्यात आले होते. तरीही कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले होते.
राष्ट्रीय पातळीवर १५ टक्के राखीव प्रवेश
नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील १५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आरोग्य विज्ञान महासंचलनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक राज्य त्यांच्या पातळीवर उर्वरित ८५ टक्के जागांवरील विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहे.
देशात अशा आहेत प्रवेशाच्या जागा
देशात वैद्यकीय शिक्षणासाठी ५४९ महाविद्यालयांमध्ये ७८ हजार ३३३ जागा आहेत. तर दंतवैद्यकसाठी ३१३ महाविद्यालयांमध्ये २६ हजार ७७३ जागा आहेत. राज्यातील ५५ महाविद्यालयांमध्ये सुमारे ८ हजार ८५० जागा उपलब्ध आहेत. तर दंतवैद्यक अभ्यासक्रमासाठी चार सरकारी महाविद्यालयांमध्ये २६० जागा तर ३४ खाजगी महाविद्यालयांमध्ये ३ हजार २५० जागा आहेत. याशिवाय एम्समध्ये एमबीबीएससाठी १ हजार २०५ जागा तर ५२५ जागा पशुवैद्यकीयसाठी आणि ५२ हजार ७२० जागा आयुषमध्ये उपलब्ध असणार आहेत.