मुंबई- ग्रेटा थनबर्ग टुलकिट प्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी होत असताना दिल्ली पोलिसांतर्फे वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला होता, तर निकिता जेकब यांची बाजू मिहीर देसाई यांनी मांडली. मंगळवारी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बुधवारी या संदर्भात निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले. तोपर्यंत निकिता जेकब यांना अटक न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय म्हटले दिल्ली पोलिसांनी
दिल्ली पोलिसांकडून कोर्टात सांगण्यात आले की, 11 फेब्रुवारी रोजी निकिता जेकब यांच्या घरी आम्ही चौकशीसाठी गेलो होतो. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या घरातील काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सुद्धा जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर निकिता जेकब यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा चौकशीसाठी हजर राहू असे आश्वासन दिल्यानंतर, आमचे पथक निकिता जेकब यांच्या घरून निघून गेले होते. सूर्यास्त झाल्यानंतर कुठल्याही महिलेची चौकशी करता येत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी दिल्ली पोलिसांचे पथक पुन्हा निकिता जेकब यांच्या घरी गेले, मात्र तेव्हा त्या घरी नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
निकिता जेकब यांच्या वकिलांचा युक्तीवाद
निकिता जेकब यांच्यातर्फे युक्तिवाद करणारे वकिल मिहीर देसाई यांनी न्यायालयाकडे 4 आठवड्यांचा ट्रांजिट जामीन मागितला आहे. तसेच तोपर्यंत जेकब यांना अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. जेकब यांची आधीच पोलिसांनी चौकशी केली आहे. तसेच त्यांच्या घरातून काही कागदपत्र देखील जप्त केली आहेत. या प्रकरणातील आणखी एक याचिकाकर्ते शंतनू मुकुल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. असेही यावेळी आपल्या युक्तीवादामध्ये निकिता जेकब यांच्या वकिलांनी म्हटले आहे.
काय आहे टूलकिट?
टूलकिट हे एक डिजिटल माध्यम आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही आंदोलनाला प्रोत्साहन कसे देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली आणि त्यावेळी हिंसाचार झाला होता. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिच्या ट्विटमधून टुलकिट चर्चेत आले होते. शेतकरी आंदोलनाबाबत टुलकिट सोशल मीडियावरून पसरवल्याचा आरोप बंगळुरुच्या दिशा रवी हिच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टुलकिट प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात दिशा रवी एक प्रमुख आरोपी आहे. टुलकिट सोशल मीडियावरून पसरवण्याबरोबरच त्यात दुरुस्ती केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सायबर पोलिसांचे विशेष पथक आरोपीची कोठडी मिळाल्यानंतर पुढील तपास करेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता निकिता जेकब आणि शंतनू मुळूकही यातील आरोपी असल्याच्या दिशेने तपास सुरू आहे.