मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आज मुंबईत 1034 नवे रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी एक हजाराच्या वर रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 1034 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 23 हजार 877 वर पोहचला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 461 वर पोहचला आहे. 712 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 2 हजार 232 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 9315 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 256 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 13 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 120 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 32 लाख 30 हजार 798 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760, 23 फेब्रुवारीला 643, 24 फेब्रुवारीला 1167, 25 फेब्रुवारीला 1145 तर आज 1034 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.