मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असून आज दिवसभरात 31 हजार 111 नव्या ( New corona cases in Maharashtra ) बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 24 रुग्ण ( corona patient deaths in Maharashtra ) दगावले आहेत. तर 29 हजार 92 रुग्ण ठणठणीत बरी होऊन घरी परतले आहेत. मात्र सक्रिय रुग्णांचा आकडा वाढत असून आज 2 लाख 67 हजार 334 इतके आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईत मात्र कोरोनाचे रुग्ण घटले आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रोनचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 122 रुग्णांना ( Omicron Patient In Maharashtra ) संसर्गाची बाधा झाली आहेत. त्यातील सर्वाधिक 40 रुग्ण पुण्यात आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
आज 31 हजार 111 नव्या बाधितांची नोंद -
आटोक्यात आलेल्या कोरोनाचा जानेवारी महिन्यात फैलाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येचा आलेख वाढतो आहे. रविवारी 41 हजार 327 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज रुग्ण संकेत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 31 हजार 111 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 72 लाख 42 हजार 921 रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. आजच्या 29 हजार 90 रुग्णांचा त्यात समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 94.03 टक्के इतका आहे. दिवसभरात 24 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 1.95 टक्के इतका खाली आला आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 21 लाख 24 हजार 824 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 10.04 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 22 लाख 64 हजार 217 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 2994 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 2 लाख 67 हजार 334 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रोनच्या 122 बाधितांची नोंद -
राज्यात ओमायक्रोनच्या रुग्ण संख्येत चढउतार दिसून येत आहेत. रविवारी 8 रुग्ण आढळून आले होते. तर गेल्या 24 तासांत 122 रुग्ण सापडले आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने 81 तर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने 41 रिपोर्टचा अहवाल दिला आहे. पुणे मनपा 40, मीरा भाईंदर 29, नागपूर 26, औरंगाबाद 14, अमरावती 3, मुंबईत 3 आणि भंडारा, ठाणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मध्ये 1 रुग्णाला बाधा झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत ओमायक्रॉनचे 1860 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. 1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 89 हजार 893 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 90 हजार 861 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 548 आणि इतर देशातील 639 अशा एकूण 1187 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 4986 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 67 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
हेही वाचा - Punjab Assembly Election 2022 : पंजाब विधानसभा निवडणूक आता 20 फेब्रुवारीला होणार