मुंबई - देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आलेली लसीकरण मोहीम १९ जानेवारीपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. मुंबईत पालिकेच्या व राज्य सरकारच्या १० केंद्रांवर ४५ बुथवर ४८४२ पैकी ४३७४ म्हणजेच ९० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना आज (शनिवारी) लसीकरण करण्यात आले. आजच्या लसीकरणादरम्यान ५ जणांवर सौम्य दुष्परिणाम जाणवून आले. मुंबईत आतापर्यंत एकूण १३,३६५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
लसीकरणाला पुन्हा सुरुवात -
मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर काही दिवसांतच मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. गेल्या दहा महिन्यांत कोरोनाला थोपवताना आरोग्य यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. मात्र पालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आता चांगलीच आटोक्यात आली आहे. यातच शनिवार १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून लसीकरणाला सुरुवात केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘बीकेसी’ कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ झाला. पालिकेच्या ९ आणि राज्य सरकारच्या एक अशा एकूण १० केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र कोविन अॅपवर तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरणाला स्थगिती देण्यात आली होती.
आतापर्यंत झालेले लसीकरण -
मुंबईत आतापर्यंत एकूण १३,३६५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यापैकी १६ जानेवारीला १९२६, १९ जानेवारीला १५९७, २० जानेवारीला १७२८, २२ जानेवारीला ३५३९ तर आज २३ जानेवारीला ४८४२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात ७३३, सायन येथील टिळक रुग्णालयात २७८, विलेपार्लेतील कूपर रुग्णालयात ५६५, नायर रुग्णालयात ४५६, सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयात ८५, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ७४०, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात ६४०, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात ३९१ आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात ४६७ तर जेजे रुग्णालयात १९ जणांना लस दिली.