मुंबई - बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण म्हणजे राणीबाग. राणीबागेत विविध प्राणी, पक्षी आणि झाडे पाहण्यासाठी मुले येतात. कोरोनामुळे गेले आठ महिने बंद असलेली राणी बाग लवकरच उघडणार आहे. त्याचवेळी पुढील वर्षी राणीबागेत वाघांसह त्यांच्या बछड्यांचीही डरकाळी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च पासून राणीबाग पर्यकटकांसाठी बंद करण्यात आली. लॉकडाऊनच्या आधीच राणीबागेत औरंगाबाद येथून वाघाची जोडी आणण्यात आली होती. त्यामधील नर वाघाचे नाव शक्ती असून तो साडेतीन वर्षाचा आहे. तर मादी वाघीनेचे नाव करिष्मा असे असून ती साडे चार वर्षांची आहे. राणीबाग ही पर्यटनाचे ठिकाण बनू नये, या ठिकाणी प्राण्यांचे ब्रिडिंग सेंटर उभे राहावे, असे आदित्य ठाकरे यांनी नवीन पिंजऱ्यांच्या उद्घाटना प्रसंगी म्हटले होते.
लवकरच पिल्लांना जन्म -
राणीबागेत ब्रिडिंग सेंटर उभे राहावे म्हणून औरंगाबाद येथून आणलेल्या शक्ती आणि करिष्मा या जोडीपासून वाघांच्या पिल्लांना जन्म देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शक्ती आणि करिष्मा या दोघांना एकत्र आणले जात आहे. गेल्या तीन महिन्यात शक्ती आणि करिष्मा दोघेही जवळ आले आहेत. मात्र त्यामधून करिष्मा गरोदर राहिलेली नाही. लवकरच करिष्मा गरोदर राहून पिल्लांना जन्म देवू शकते, असे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.
तीन ते चार पिल्ले -
नर आणि मादी वाघ एकमेकांच्या जवळ आल्यावर तीन महिन्यांनी पिल्ले देतात. वाघीण एकावेळी तीन ते चार पिल्लांना जन्म देऊ शकते. पिल्लं झाल्यावर दीड वर्षांनी पुन्हा नर आणि मादी एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. सध्या शक्ती साडेतीन तर करिष्मा साडेचार वर्षाची आहे. यामुळे कदाचित या दोघांची जोडी बनत नसावी. या दोघांची जोडी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दोघांची जोडी बनली की पुढील वर्षात वाघांच्या बछड्यांची डरकाळी ऐकू येऊ शकते, असा विश्वास त्रिपाठी यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - बच्चे कंपनीची आवडती राणीबाग लवकरच होणार खुली
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात दिवसभरात ३ हजार ८८० कोरोनाचे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू