मुंबई - सरकारने डबेवाल्यांना 5 ऑक्टोबरपासून लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली. मात्र लोकल प्रवासासाठी 'क्यू आर कोड' बंधनकारक असल्याने डबेवाल्यांचा प्रवासाचा प्रश्न बारगळला होता. अखेर राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार केंद्र सरकारकडून रेल्वेच्या विभागीय कार्यालयाला दिलेल्या पत्रात डबेवाल्यांना त्यांचे मूळ ओळखपत्र दाखवून रेल्वे प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
राज्य सरकारने परवानगी देऊनही 'क्यू आर कोड' अभावी गेले दोन दिवस डबेवाल्यांचा लोकल प्रवास मुकला होता. याचा पाठपुरावा राज्य शासनाने केल्यानंतर आता डबेवाल्यांचा लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आजपासून मुंबईचे डबेवाले लोकलने प्रवास करून डब्याची सेवा देणार आहेत. यामुळे गेले सहा महिने उदरनिर्वाह बंद असलेल्या डबेवाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
डबेवाल्यांच्या संघटनांनी राज्य शासनाचे व रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.