मुंबई : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये राज्यात वाढ होताना दिसत आहे. आज नव्या स्ट्रेनचे तीन नवीन रुग्ण आढळले असून, हे रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. यानंतर राज्यातील नव्या स्ट्रेनच्या रुग्णांचा आकडा 11वर पोहचला आहे. त्याचवेळी एक दिलासादायक बाब म्हणजे या 11 पैकी 2 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नव्या स्ट्रेनचा शिरकाव..
22 डिसेंबरपासून ब्रिटनवरून येणारी विमान सेवा बंद करण्यात आली आहे. तर ब्रिटन आणि युरोपवरून आलेल्या तसेच येणाऱ्यांना क्वारंटाइन करत त्यांची चाचणी करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) कडे नव्या स्ट्रेनच्या तपासणीसाठी पाठवले जात आहेत. त्यानुसार आतापर्यंत 8 रुग्ण नव्या स्ट्रेनचे असल्याचा अहवाल 4 जानेवारीला आला. तर आज एनआयव्ही कडून आणखी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्या स्ट्रेनचे जे रुग्ण आले आहेत ते पिंपरी-चिंचवडचे आहेत.
आतापर्यंत 75 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह..
ब्रिटन आणि युरोप मधून राज्यात आलेल्या 4,858 प्रवाशांना आतापर्यंत (7 जानेवारी) शोधत त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यात 1,211 प्रवासी 28 दिवस पूर्ण केलेले आहेत. तर यातल्या 3,476 जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. यातून 75 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात मुंबईतल्या 33, पुण्यातील 14, ठाण्यातील 8 नागपूरमधील 9 तर नाशिक, औरंगाबाद, रायगड आणि बुलडाणा येथील प्रत्येकी 2 तसेच उस्मानाबाद, नांदेड, वाशिम मधील प्रत्येकी 1असे हे रुग्ण आहेत. दरम्यान या 75 पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 522 जणांचा शोध घेत यातील 341 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
11 रुग्णांपैकी एक जण गुजरातचा तर एक जण गोव्याचा रहिवासी..
आतापर्यंत एनआयव्हीकडे 75 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 18 नमुन्याचा अहवाल आला आहे. त्यानुसार आतापर्यंत, 7 जानेवारी पर्यंत 11 रुग्णांना नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. दरम्यान या 11 पैकी एक रुग्ण गुजरातचा तर एक रुग्ण गोव्याचा रहिवासी आहे. तर 11 पैकी कोरोना मुक्त झालेल्या 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील एक जण पुण्याचा तर एकजण मुंबईचा आहे. तर आणखी दोघे जण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा : राज्यात ३ हजार ७२९ नवे कोरोनाग्रस्त, ७२ रुग्णांचा मृत्यू