मुंबई- सोशल मीडियाद्वारे देशभरातील हायप्रोफाईल व्यक्तींंशी संपर्क साधून, त्यांच्याकडून सेक्सटोर्शनच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या टोळीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अशाप्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या, या प्रकरणाचा शोध घेत असताना पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी फेसबुक, गुगल, व्हाट्सअप, टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया साधनांचा वापर करून, त्यावर पूजा शर्मा व नेहा शर्मा अशा नावाने फेक प्रोफाईल बनवली होती. आरोपी या माध्यमातून हायप्रोफाईल लोकांशी संपर्क साधायचे, साधारणपणे शनिवारी किंवा रविवारी आरोपी या व्यक्तींशी संपर्क साधत असल्याचे पोलिसांनी सांगितले, त्यानंतर आरोपी संबंधित व्यक्तींचे व्हाट्सअप नंबर घेऊन त्यांना कॉल करत होते. कॉल केल्यानंतर अचानक पॉर्न व्हिडिओ त्या व्यक्तीच्या मोबाईलवर दिसत होता. त्यानंतर आरोपी त्या व्यक्तीच्या न कळत तो व्हिडिओ रेकॉर्ड करत होते.
आरोपी केवळ 8 वी पास
सायबर पोलिसांनी या संदर्भात तपास करत असताना हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या ठिकाणी छापेमारी करून 3 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे शिक्षण केवळ 8 पर्यंत झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. हे आरोपी प्रथम ज्या व्यक्तीची फसवणूक करायची आहे, त्याच्याबद्दलची सर्व माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तींमध्ये राजकारणी, अभिनेते, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आरोपींनी या लोकांना धमकावून लाखोंची खंडणी वसूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींकडून पोलिसांनी 54 मोबाईल फोन हस्तगत केले असून, आरोपींची 58 बँक खाती गोठवण्यात आली आहे. तसेच आरोपी चालवत असलेले फेसबुकवरील 171 पेज पोलिसांनी बंद केले आहेत.
गुन्हे करण्यासाठी घेतले 3 दिवसांचे प्रशिक्षण
पोलिसांच्या दाव्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी व्हिडिओ कसे बनवायचे या संदर्भातले तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण सुद्धा घेतले होते. सदरचे सेक्सटोर्शन रॅकेट हे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थानच्या काही भागातून सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अशा प्रकारांना बळी पडू नये यासाठी काय काळजी घ्यावी?
कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी फेसबुक सारख्या सोशल मीडियावर मैत्री करू नये
अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल नंबर देऊ नका
तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका
पैशांची मागणी केल्यास त्यांना पैसे न देता, पोलिसांशी संपर्क साधा