मुंबई - शहरातील पंचतारांकित हॉटेल 'ताज' उडवण्याची धमकी देण्यात आली असून संबंधित फोन कॉल पाकिस्तानातून आल्याचे वृत्त आहे. संबंधित फोन कॉल वांद्रे येथील ताज 'लँड्स एंड'ला करण्यात आला आहे. मध्यरात्री 12.30 वाजता पाकिस्तानातून फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. आता धमकी दिल्यानंतर हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजता हॉटेल ताज पॅलेसच्या कर्मचाऱ्यांना फोन आला. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले. यावेळी संबंधित व्यक्तीने 2008प्रमाणेच हल्ला करणार असल्याची धमकी दिली. यानंतर दुसरा फोन वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे आला. तेथेही कॉल रिसीव्ह करणार्या कर्मचार्यांना याच पद्धतीने धमकावण्यात आले. दोन्ही ठिकाणी एकाच क्रमांकावरून पाकिस्तानातून फोन आले आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुंबई पोलिसांनी हॉटेलची सुरक्षा वाढवली आहे. सायबल सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दूरध्वनी विभागाकडूनही मदत घेतली जात आहे.
26 नोव्हेंबर 2008रोजी मुंबईच्या ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी समुद्राद्वारे पाकिस्तानातून केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 166 लोक ठार झाले होते. तर सर्व हल्लेखोर दहशतवादीही ठार झाले होते. अजमल कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला. त्याला नंतर फाशी देण्यात आली.