मुंबई - शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून हिंदूत्वावरुन भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघासह केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, हिंदूत्वाला धोका हा परक्यांपासून नाही तर आपल्याच नवहिंदूंपासून आहे.
- मुंबईसाठी मोठी घोषणा -
मुंबईत मराठी भाषा भवन, धारावीतील लोकांचे पुनर्वसन करून जागतिक दर्जांचे आर्थिक केंद्र आणि लष्करांचे एक मोठे संग्रहालय उभारणार आहे अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
- भाषणाच्या सुरूवातीलाच फडणवीसांना लगावला टोला -
देवेंद्र फडणवीस यांनी अजुनही मला मी मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं वक्तव्य केलं होतं. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की,'माझा जन्म महाराष्ट्रात झाला पाहिजे हेच मला वाटतं. मला कधीही मी मुख्यमंत्री आहे असं वाटू नये, मलाच काय पण जनतेलासुद्धा मुख्यमंत्री आहे असं वाटू नये. तर मी घरातलाच भाऊ किंवा कोणीतरी आहे असं वाटावं.' काही जणांना वाटतं की, जे बोलत होते मी पुन्हा येईन, ते बोलतायत आता मी गेलोच नाही, बस तिकडे आहेत ते तिकडेच राहिले असाही टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना लगावला.
- खरं वैभव जोरजबरदस्तीने मिळत नाही -
'काही जणांना वाटतं की, जे बोलत होते मी पुन्हा येईन, ते बोलतायत आता मी गेलोच नाही, बस तिकडे आहेत ते तिकडेच राहिले, मला नेहमी आजोबांनी एक शिकवण दिली आहे की, अहमपणा डोक्यात गेला त्या क्षणी तू संपलास. नेहमी जनतेशी नम्र रहा. तो प्रयत्न मी माझे माझे न करता, नम्रपणाने आशीर्वाद घेत असतो. हे आशीर्वाद हीच तर ताकद आहे, हे मागून कोणाला मिळत नाही. हे खरं वैभव आहे हे खरं ऐश्वर्य आहे. हे जोरजबरदस्तीने मिळत नसतात ते कमावावे लागतात आणि ती कमावण्याची परंपरा ही आपल्याला मिळालेली आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवले.
- ठाकरे कुटुंबावर टीका करणे हे त्यांचे रोजगार हमीचे काम -
आज मी कोणाला बोलणार, कोणाचे वाभाडे काढणार अशी चर्चा आहे. मनात विषयांची गर्दी झाली. पण कोरोनाच्या या काळात गर्दी चालत नाही, आता विचारांची गर्दी कशी टाळणार, माझ्या भाषणानंतर माझे भाषण संपतंय कधी याची अनेकजण वाट पाहतायत. प्रतिक्रिया देण्यासाठी आतुर झाले असतील. त्यांना बोलुद्या. टीकाकारांसाठी बोलत नाही मी जनतेसाठी, माता भगिनींसाठी बोलतोय. ठाकरे कुटुंबीयांवर हल्ले करतायत. खरंतर असा कोणी माई का पूत जन्माला आला नाही ठाकरे कुटुंबावर हल्ला करणारा. आता ठाकरे कुटुंबावर सतत टीका करत राहणं हे त्यांच्यासाठी रोजगार हमीचे काम झालंय असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
- षण्मुखानंद सभागृहात पार पडला दसरा मेळावा -
दरवर्षी दसरा मेळावा हा शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क येथे व्हायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी येथून शिवसेनेचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत भाषणाच्या माध्यमातून पोचवले. या दसरा मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल व्हायचे. दरवर्षी मोठी गर्दी उसळत असे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गेल्या अनेक वर्षांपासून शिवतीर्थावर शिवसेनेचे विचार तळागाळातील शिवसैनिकांत पर्यंत पोहोचवण्याचे काम केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यानंतर विराजमान झाले. याच दरम्यान कोरोना आल्याने शिवसेनेच्या दसरा मेळावा ऑनलाइन घ्यावा लागला होता. मात्र यंदा संक्रमण कमी झाल्याने कोरोना नंतर प्रथमच षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा मोजक्या पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाला संबोधित केले.
हेही वाचा - सरकार पाडण्यापेक्षा जनतेची कामे महत्त्वाची, पंकजा मुंडेंच्या स्वकीयांना कानपिचक्या