मुंबई - वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण आयोजित न केल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा आर्थिक फटका आहे. त्यामुळे तातडीने प्रशिक्षण आयोजित न केल्यास ५ सप्टेंबर शिक्षक दिनाला आंदोलन करण्याचा इशारा भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिला आहे.
मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान
अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांना निवेदन पाठविले आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना १२ वर्षांनंतर वरिष्ठ व २४ वर्षानंतर निवडश्रेणी मिळते. वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे हा महत्वाचा निकष आहे. परंतु राज्यात मागील अनेक वर्षांपासून हे प्रशिक्षण आयोजित न केल्यामुळे शेकडो शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणीपासून वंचित आहेत. सेवांतर्गत प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे आहे. परंतु, सदर संस्थेने प्रशिक्षणच आयोजित न केल्याने शिक्षकांच्या सेवानिवृत्तीवर परिणाम होत आहे. परिणामी, अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
शिक्षकांवर अन्याय
मागील महिन्यात शालेय शिक्षण विभागाने २० जुलै रोजी वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला. एक महिना उलटून गेल्यावर सुद्धा काहीच कारवाई होत नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. सदरची बाब गंभीर स्वरुपाची असून शासकीय हलगर्जीपणामुळे शिक्षकांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे तातडीने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचा निर्णय घ्यावा. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी दिला आहे.
हेही वाचा - काबूल विमानतळाबाहेर चेंगराचेंगरी, सात जण ठार - ब्रिटीश लष्कर