मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये इतर पक्षातून इन्कमिंग जोरदार सुरू आहे. काल मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, पालघर, मुंबई या जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी काल मनसेत प्रवेश केला होता.
जुने दिवस परत आणण्यासाठी...
आज नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र काही वर्षात पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्याने जिल्ह्यात पक्ष कमकुवत झाला आहे. मात्र जुने दिवस परत आणण्यासाठी स्थानिक मनसे नेत्यांनी कंबर कसली आहे. आजदेखील नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला.
कालदेखील झाली होती मेगा भरती
ठाणे आणि वसई विरारमधील शेकडो भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचादेखील समावेश आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. चांदिवली विधानसभा क्षेत्रातील 500 उत्तर भारतीयांनीदेखील आज मनसेत प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांनी आयोध्येला जाणार, अशी घोषणा केल्यानंतर आम्हीदेखील त्यांना समर्थन देण्यासाठी आज या ठिकाणी प्रवेश करायला आलो आहोत, असे काही कार्यकर्त्यांनी या प्रवेशावेळी सांगितले होते.