मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र केंद्र सरकारकडे मागणी करूनही लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने तसेच पुढील साठा 15 एप्रिलला येणार असल्याने मुंबईत 120 पैकी खासगी 25 आणि पालिकेच्या 5 अशा एकूण 30 केंद्रांवर गुरुवारी लसीकरण बंद झाले आहे. पालिकेची 33 पैकी 5 केंद्र बंद झाली आहेत. आजही बहुसंख्य केंद्र बंद होणार आहे. त्यामुळे मुंबईतील लसीकरण ठप्प होणार आहे.
लसीकरण होणार ठप्प
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून मुंबईत लसीकरण सुरू झाले. सुमारे अडीच महिन्यांहून अधिक काळ लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला लसीकरणाला थंड प्रतिसाद मिळत होता. नंतर लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला. यामुळे पालिकेला मिळालेला लसीचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. मुंबईत महापालिकेच्या 33, राज्य आणि केंद्र सरकारच्या 16 तर खासगी 71 लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्यापैकी खासगी रुग्णालयातील 25 लसीकरण तर महापालिकेच्या रुग्णालयातील 5 अशा एकूण 30 केंद्रांवर काल गुरुवारी लसीकरण बंद झाले आहे. गुरुवारी पालिकेच्या 8 केंद्रांवर 1 दिवस, 10 केंद्रांवर 2 दिवस, 2 केंद्रांवर 3 दिवस, 4 केंद्रांवर 4 दिवस पुरेल इतका, एका केंद्रावर 5 दिवस तर एका केंद्रावर 7 दिवस पुरेल इतका लसीचा साठा आहे. यामुळे आज शुक्रवारी बहुसंख्य केंद्र लसीअभावी बंद पडणार आहेत.
पालिकेच्या रुग्णालयात किती लसीचा साठा
व्ही एन देसाई, बिकेसी जंबो, बांद्रा भाभा, सेव्हन हिल्स, कांदिवली आंबेडकर हॉस्पिटल, सवित्रीबाई फुले, दहिसर जंबो सेंटर, ठाकरे मॅटर्निटी होम या 8 ठिकाणी एकच दिवस पुरेल इतकाच साठा आहे. हा साठा कधीही संपणार असल्याने लसीकरण बंद पडणार आहे. नायर, केईएम, शिरोडकर मॅटर्निटी होम, कूपर, गोकुलधाम मॅटर्निटी होम, एस. के. पाटील, एम डब्लू देसाई, कुर्ला भाभा, मुलुंड जंबो कोविड सेंटर, मिठागर म्युनिसिपल शाळा या 10 ठिकाणी 2 दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा आहे. अर्बन हेल्थ सेंटर धारावी, गणेश नगर लसीकरण केंद्र घाटकोपर या 2 ठिकाणी 3 दिवस पुरेल इतका लसीचा साठा आहे. बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर, सेंटनरी गोवंडी, शिवाजी नगर सीसीसी, सावरकर हॉस्पिटल मुलुंड या 4 ठिकाणी 4 दिवस पुरेल इतकाच साठा आहे. मा हॉस्पिटल चेंबूर येथे 5 दिवस पुरेल इतका साठा आहे तर एलबीएस मॅटरनिटी भांडुप येथे 7 दिवसांच्या लसीचा साठा आहे.
कोव्हॅक्सीनचा वापर केवळ दुसऱ्या डोससाठी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा वापर राज्य सरकारच्या काही रुग्णालयांत आणि नंतर पालिकेच्या पाच रुग्णालयांत करायला सुरुवात झाली. मात्र, मुंबईत कोव्हॅक्सीन घेणाऱ्यांची संख्या खूप कमी असली तरी या लसीच्या तुटवड्यामुळे आता नव्याने लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीला ही लस न देता कोव्हिशील्ड दिली जात आहे तर कोव्हॅक्सीन लसीचा साठा केवळ दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तीला देण्यासाठी ठेवण्यात आला आहे. तसे निर्देश सगळ्याच लसीकरण केंद्रांना पालिकेने दिले आहेत, अशी माहिती नेस्को जम्बाे सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.
लसीसाठी पाठपुरावा सुरूच
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. पालिकेने लसीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्याने केंद्र सरकारकडे लसीचा पुरवठा करण्यासाठी पत्र दिले आहे. लसीचा साठा मिळावा, यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
लसीकरण थांबण्याला केंद्र सरकार जबाबदार - महापौर
मुंबईला लसीचा साठा कमी मिळाला असल्यामुळे आज दिवसभरात लसीकरण सुरू राहील. मात्र, उद्यापासून त्याचा फटका अनेक लसीकरण केंद्रांना बसणार असून त्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करावी लागणार आहेत. केंद्र सरकार जगाला लस वाटत सुटले आहे. अगदी पाकिस्तानलाही केंद्र सरकारने लस पाठवली आहे. मग महाराष्ट्राला पुरेसा साठा का पाठवला नाही. त्यामुळे लसीकरण थांबले तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार असेल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
हेही वाचा - वाझे प्रकरणात आपला काडीचा संबंध नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार