मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. काही प्रमाणात या जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढच्या काही दिवसांत अनेक सण येऊन ठेपले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे परिणाम यावेळी जाणवतील, अशी धास्ती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. यावेळी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही टोपे यांनी केले.
तीव्रता कमी करण्यासाठी त्रिसूत्री पाळा -
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसरी लाट थोपवायची असेल तर आपल्याला काळजी घ्यावी लागेल असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याची री ओढली आहे. जगात स्पेन, युके, रशिया, इंडोनेशिया मध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. लसीकरण झालेल्या देशात तिसऱ्या लाटेचा धोका कमी प्रमाणात जाणवला आहे. लसीकरण करणे महत्वाचे आहे. भारतातल्या तिसऱ्या लाटेबाबत अद्याप अंदाज आलेला नाही. महाराष्ट्रात आगामी काळात सणवार खूप आहेत. त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करायची असेल, शासनाच्या त्रिसुत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय, लसीकरणही महत्वाचे आहे. जर तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल, तर काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन आरोग्य टोपे म्हणाले.
केंद्राकडे अधिक लसींची मागणी -
राज्यात अनेक शहरांमध्ये लसींअभावी लसीकरण सातत्याने बंद होत आहेत. याबाबत केंद्र सरकार राज्याला ज्या लसी पुरवत आहे, त्या प्रत्येक जिल्ह्याला सम प्रमाणात दिल्या जात आहेत. राज्य सरकारकडून नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, लसींचा पुरवठा नियमित होत नसल्याने अडथळा येत आहे, असे टोपे म्हणाले. केंद्राने त्वरित लसींच्या डोसचा पुरवठा करावा, या मागणीसाठी केंद्राला पत्र लिहिणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
आव्हानांचा अभ्यास करुन लोकल प्रवासाचा निर्णय -
लोकल प्रवासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्याला फटकारले. लसींचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास मिळत नसेल, तर दोन लसी घेतलेल्यांचा अर्थ काय, असा सवाल उपस्थीत केला होता. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावर भाष्य करताना लोकल प्रवासाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेत असतात. सर्व बाबी त्यांना माहिती आहेत. काही निर्णय आव्हानांचा अभ्यास करुन घ्यावे लागतात. तसेच दोन्ही डोसला तपासता येऊ शकेल का, या गोष्टी पहाव्या लागतात. मात्र, लोकल प्रवासाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कुठेही नकार दर्शवला नसल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.