मुंबई - मुंबईतील चोर बाजार हा दुर्मिळ, ऐतिहासिक वस्तू, शिल्प, विविध प्रकारची साहित्य आदींसाठी सर्वश्रुत आहे. याच चोर बाजारात भारतीय सिनेमा सृष्टीच्या सुरुवातीपासूनच्या जुन्या चित्रपटांची पोस्टर्स 'बॉलिवूड' नावाच्या एका दुकानात उपलब्ध आहेत. सोबतच त्यावेळच्या सिनेमागृहात चालणाऱ्या चित्रपटांची तिकिटे या चोर बाजारातील दुकारात जतन करण्यात आली असून ती देश-विदेशातील अभ्यासकांचे आकर्षण ठरली आहेत.
'बॉलिवूड' या दुकानाचे मालक आहेत वाहिद मन्सुरी. चोर बाजारातील हजरत हसनुल मोईनी चौकाशेजारी त्यांचे हे दुकान आहे. या दुकानात भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुरूवातीपासूनचे अत्यंत दुर्मिळ अशी पोस्टर्स आणि त्या वेळी विविध सिनेमागृहातील चित्रपटांची तिकीटे जतन करण्यात ठेवण्यात आली आहे. एखाद्या जुन्या संग्रहालयांमध्येही शोभून दिसावी अशीच ही पोस्टर्स विविध रंगाने सजलेली आहेत.
जुन्या व ऐतिहासिक चित्रपटांची पोस्टर्स -
अत्यंत विलोभनीय आणि भारतीय चित्रपटांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्टर्समध्ये मुगले आझम, रजिया सुल्तान, आलम आरा, प्यासा आदी अनेक चित्रपटांची त्या काळात काढण्यात आलेली विविध रंगातील पोस्टर्स येथे उपलब्ध असून ती पाहण्यासाठी सिनेकलावंत, जुन्या चित्रपटावर समीक्षा आणि लिखाण करणारे असंख्य अभ्यासक येथे भेट देत असतात, अशी माहिती वाहिद मन्सुरी यांनी दिली.
पोस्टर्ससोबत जुने ग्रामोफोनचेही जतन -
गुरूदत्त, दिलीपकुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, अशोक कुमार यांच्यापासून ते राजकपूरपर्यंतच्या काळातील अनेक चित्रपटांची ही पोस्टर्स येथे पहावयास मिळतात. विशेष म्हणजे यातील अनेक चित्रपटांच्या अनेक प्रकारच्या ग्रामोफोन आणि त्यांचे संचही वाहिद अन्सारी यांनी जतन करून ठेवली आहेत.
वडिलांनी जपला होता वारसा -
आपल्या मागील तीन पिढ्यांपासून चोर बाजारातील या दुर्मिळ वस्तूंचे जतन करण्याचा वारसा चालवत आहोत. वडील गणपती, ईद आणि अनेक ठिकाणच्या जत्रांमध्ये फिल्म हाताने चालणारे छोटे सिनेमागृह चालवायचे. गावोगाव जायचे. पुढे यांनी गुरूदत्त यांच्यासोबत त्यांनी कामे केले होते, त्यावेळपासूनच आपल्या वडिलांनी जुन्या चित्रपटांचा संग्रह केला असल्याचे त्यांनी सांगितले.