मुंबई - महाविकास आघाडीच्या एकामागोमाग एक नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या. ठाकरे सरकारचे दोन मंत्री आतापर्यंत कोठडीत आहेत. दोघांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. डझनभर नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशीचा ससेमिरा लावला आहे. तर, दुसरीकडे भाजपचा एखादा नेता किंवा आमदार टप्प्यात आला की, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जातो. मग ते नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे असोत, चंद्रकांत पाटील असोत वा खुद्द देवेंद्र फडणवीस. एकमेकांना कशात तरी अडकवायचे आणि मजा पाहायची, हाच खेळ मविआ आणि भाजपत अनेक महिने सुरू आहे. त्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. पण या अधिवेशनात आपण टप्प्यात येऊ, अशी भीती फडणवीसांना वाटत आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा - Atul Londhe On Phone Tapping Case : रश्मी शुक्लांना आदेश देणाऱ्या 'बिग बॉस’चा शोध घ्यावा - अतुल लोंढे
महाविकास आघाडीची सरकार राज्यात अस्तित्वात आल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना अधिकच टार्गेट केले आहे. या पक्षांमधील नेत्यांना देखील फडणवीस यांनी टारगेट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना केंद्रीय यंत्रणेने जेलमध्ये ठेवले आहे. तसेच, शिवसेनेचे प्रमुख नेते यांना देखील केंद्रीय यंत्रणेने रडारवर ठेवले आहे. महाविकास आघाडीचे स्थापनेत प्रमुख वाटा असलेले संजय राऊत यांच्या पत्नीला केंद्रीय यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले होते. तसेच, त्यांच्या निकटवर्तीय लोक देखील केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत.
भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता
महाविकास आघाडीने देखिल जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली असल्याने भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मागील अधिवेशनादरम्यान भाजपचे बारा आमदार निलंबित केले होते. मात्र, त्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन राज्य सरकारच्या निलंबनाच्या आदेशाविरुद्ध तक्रार केली. काही काळ निलंबन करण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली होती. त्या बारा आमदारांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची धुरा असलेले प्रमुख नेते आशिष शेलार यांचा देखील समावेश होता. त्यामुळे, या अधिवेशनात आमदारांनी निलंबन टाळण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे आणि निलंबन होणार असे कोणतेही कृत्य करू नये, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना दिले आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता
फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अनेक राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते, ही बाब उघड झाली आहे. या संदर्भात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुणे आणि मुंबईत गुन्हा देखील दाखल झाला आहे. याच फोन टॅपिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील चौकशी केली जाणार आहे. त्यासंदर्भात मुंबई सायबर सेलने फडणवीस यांना समन्स देखील बजावले होते. मात्र, चौकशीला गेले नाही. याच प्रकरणावरून सत्ताधारी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना या अधिवेशनात घेरू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महाविकास आघाडीचा आम्ही पुन्हा 162
महाविकास आघाडीकरिता हे अधिवेशन महत्त्वाचे असणार आहे. त्यामागील कारण असे की, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. तसेच, महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात भाजपकडून जे रोज नवीन नवीन आरोप होत आहेत, त्याला कशाप्रकारे उत्तर द्यायचे त्या संदर्भात देखील रणनीती ठरली आहे. मात्र, भाजपकडून ज्या प्रमाणात महाविकास आघाडी सरकार कोसळेल असे भाकित केले जात आहे त्यालाच उत्तर देण्याकरिता ज्याप्रमाणे महाविकास आघाडीची स्थापना होण्यापूर्वी सर्व आमदारांना एकत्रित करून 162 चा नारा दिला होता त्याचप्रमाणे या अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीने नारा दिला आहे. यावरूनच हे अधिवेशन महाविकास आघाडीकरिता किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते.
हेही वाचा - Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन योजनेतील खर्चाच्या नोंदणीत १४२ कोटींची तफावत, मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश