मुंबई - मानखुर्दच्या मंडळा परिसरात एका महिलेला मुले पळवणारी समजून जमावाने तिला मारहाण केली. दरम्यान, मानखुर्द पोलिसांनी हस्तक्षेप करीत महिलेस पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यावेळी संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
रविवारी रात्री मानखुर्द परिसरात एका 4 वर्षीय मुलीला पळवून नेण्याची घटना घडली. त्यानंतर सोमवारी दुपारी मानखुर्दच्या मंडाळा परिसरात एक महिला संशयास्पद रित्या फिरत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी त्या महिलेची चौकशी केली असता ती काहीच बोलत नव्हती. त्यामुळे ही महिला लहान मुले पळवणारी असल्याचा समज नागरिकांमध्ये झाला. स्थानिकांनी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी लगेच त्या महिलेला ताब्यात घेतले आणि तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यास निघाले. त्यावेळी संतप्त नागरिकांनी महिलेला पोलिसांच्या ताब्यातून हिसकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या महिलेला आपल्या गाडीत टाकून नेत असतांना स्थानिकांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलवावी लागली. पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार सुद्धा केला. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.