मुंबई - महानगरपालिकेने मुंबईबद्दल वादग्रस्त विधान करणारी सिने अभिनेत्री कंगना रणौतचे बेकायदेशीर बांधकाम 24 तासाची नोटीस देऊन तोडले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहित अन्य 6 सुप्रसिद्ध लोकांची बांधकामे पालिकेने नियमित केली आहेत, अशी माहिती पालिकेच्या पी दक्षिण विभागाने दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
गोरेगाव पूर्व येथे अमिताभ बच्चन, राजकुमार हिराणी, ओबेरॉय रियालिटी, पंकज बलानी, हरेश खंडेलवाल, संजय व्यास, हरेश जगतानी अशा सात जणांचे बंगले आहेत. मंजूर आराखड्यानुसार आढळून आलेल्या अनियमितता पूर्ववत करण्यासाठी एमआरटीपीची नोटीस 7 डिसेंबर 2016 बजावली होती. एमआरटीपीची नोटीसनंतर वास्तुविशारद शशांक कोकीळ यांनी 5 जानेवारी 2017 रोजी सादर केलेला प्रस्ताव 17 मार्च 2017 रोजी इमारत व प्रस्ताव खात्याने नामंजुर केला.
याबाबत इमारत व प्रस्ताव खात्याने 11 एप्रिल 2017 रोजी पी दक्षिण कार्यालयास रीतसर माहिती देताच 6 मे 2017 रोजी पी दक्षिण कार्यालयाने अंतिम आदेश जारी करत अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढण्याची तंबी दिली. यानंतर वास्तुविशारद शशांक कोकीळ यांनी दुसऱ्यांदा प्रस्ताव सादर केला होता. वास्तुविशारद शशांक कोकीळ अॅड. असोसिएट्स यांनी आराखड्यात नसलेल्या बाबी मंजूर करण्यासाठी सुधारित आराखडे मंजुरीकरिता कार्यकारी अभियंता, इमारत प्रस्ताव (पश्चिम उपनगरे), पी विभाग यांच्याकडे सादर केले होते त्यानंतर कार्यकारी अभियंता, इमारत प्रस्ताव (पश्चिम उपनगरे), पी विभाग यांच्याकडून अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आलेले आहे.
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त यांना पत्र पाठवून एमआरटीपी कायदा अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी करत अनधिकृत बांधकामे तोडण्याची मागणी केली होती. परंतू या अनधिकृत बांधकामास नियमित करण्यासाठी वेळखाऊ धोरण पालिकेने अवलंब करण्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. गरिबांच्या झोपडीवर बुलडोझर चालविणारी मुंबई महानगरपालिका बड्या धेंड्याच्या अनधिकृत बांधकामास नियमित करण्यात धन्यता मानते, अशी खंत अनिल गलगली यांनी व्यक्त केली आहे.