मुंबई - मुंबईमधील पूल धोकादायक झाल्याने त्या पुलांवरील वाहतूक बंद करावी लागली आहे. त्यातच एका ट्रक ड्रायव्हरने रे रोड येथील पुलाच्या खांबाला धडक दिली. त्यामुळे पुलाचा खांब मोडकळीस आला आहे. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव या पुलाखालील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकाजवळ पूल आहे. याचा काही भाग महापालिकेतील तर काही भाग रेल्वेच्या हद्दीत येतो. बुधवारी दुपारी या पुलाच्या खांबाला ट्रकने धडक दिली. या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू झाला. तर ट्रकने पुलाच्या खांबाला धडक दिल्याने खांब मोडकळीस आला. पुलाच्या खांबाला धडक दिल्याने खांब मोडकळीस आल्याचे निदर्शनास येताच येथील वाहतूक बंद करण्यात आली.
हेही वाचा - मुंबईत गणेश विसर्जनाची तयारी जय्यत, बंदोबस्तासाठी ४० हजाराहून अधिक पोलीस तैनात
रे रोड पूल धोकादायक असल्याने त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. मात्र या पुलावर अनधिकृत झोपड्या असल्याने पुनर्बांधणी कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या झोपड्या हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाचा काही भाग रेल्वेच्या तर काही भाग पालिकेच्या अखत्यारित आहेत. त्यामुळे यामध्ये समन्वय साधून पुलाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या पुलाखालून जाणाऱ्या १० मर्यादित व २० मर्यादित, ४३, ४४ व ४५ या बस गाड्या राम भाऊ भोगले मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तसेच कुर्ला स्थानक पूर्व ते माझगाव दरम्यान धावणारी बस क्रमांक ६० रे रोड स्थानकापर्यंत स्थगित करण्यात आली. लालबहादुर शास्त्री महाविद्यालय शिवडी ते वडाळा आगार दरम्यान धावणारी बस क्रमांक १६८ मुस्तफा बाजारापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.