मुंबई- ट्रेनला उशीर होणे हे काही सर्वसामान्यांसाठी नवीन नाही. मात्र आता उशीर झाला तर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळणार आहे. लखनऊ-दिल्ली 'तेजस एक्स्प्रेस' या देशातील पहिल्या ‘खासगी रेल्वेला’ एक तासाहून अधिक उशीर झाल्यास त्यासाठी नुकसानभरपाई मिळणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) ऑक्टोबर महिन्यात ही गाडी सुरू होणार आहे.
भारतीय रेल्वे आता नव्या काळात नवी सुरवात करण्याच्या तयारीत आहे. यानुसार आयआरसीटीसी मार्फत दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस या रेल्वेंना खासगी स्वरूपात चालवले जाणार आहे. या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी प्रीमीयम पध्दतीच्या सुखसोयी असणार आहेत. पहिली ट्रेन दिल्ली ते लखनऊ दरम्यान धावणार आहे. तसेच तेजस एक्स्प्रेसचे भाडे याच मार्गावरून धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसएवढेच असणार आहे. पण यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. दुसरी तेजस नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे.